तीन वर्षांपासून दुरवस्था कायम; दोन राज्यसभा, एक लोकसभा खासदार आणि दोन आमदार असतानाही उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त कधी?
नांदेड (शेख मुख्तार) : नांदेड शहरात येण्यासाठी आणि शहराबाहेर जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेल्या मालटेकडी उड्डाणपुलाची अवस्था गेल्या जवळपास तीन वर्षांपासून दयनीय बनली आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याचा काही भाग उखडलेला असून काँक्रिटची झीज झाली आहे आणि लोखंडी सळ्या उघड्या पडल्याचे छायाचित्रातून दिसून येत आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या उड्डाणपुलाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हा उड्डाणपूल नांदेडच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून त्यावरून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने, रुग्णवाहिका, दुचाकी, चारचाकी आणि अन्य प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. अशा परिस्थितीत रस्त्यावर उघड्या पडलेल्या सळ्या आणि खराब झालेला भाग गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
दोन राज्यसभा खासदार, एक लोकसभा खासदार, दोन आमदार… तरीही उड्डाणपूल बेवारस का? : नांदेड जिल्ह्याला राजकीय प्रतिनिधित्वाची कमतरता नाही. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण करीत आहेत त्याचबरोबर, नांदेडशी संबंधित राजकीय प्रतिनिधित्वाच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यसभा खासदार, एक लोकसभा खासदार आणि नांदेड शहरातील दोन विधानसभा मतदारसंघांचे आमदार असतानाही शहराच्या प्रमुख उड्डाणपुलाची अशी अवस्था का कायम आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासन आहे, संबंधित बांधकाम यंत्रणा आहे; मग तीन वर्षांपासून हा प्रश्न सुटत का नाही? हा आता नांदेडकरांसाठी मोठा प्रश्न बनला आहे.
उड्डाणपूल एवढा खराब होईपर्यंत संबंधित विभागाने नेमके काय केले? : उड्डाणपुलावरील ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. दिवसेंदिवस रस्त्याची झीज वाढत गेली, काँक्रिट खराब झाले आणि लोखंडी सळ्या उघड्या पडल्याचे चित्र दिसत असताना संबंधित विभागाने वेळेत कायमस्वरूपी उपाययोजना का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न टाळला जाणार आहे का? उड्डाणपुलाची संपूर्ण तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे का? दुरुस्तीसाठी निधी मंजूर आहे का? कामाची निविदा काढण्यात आली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष दुरुस्ती कधी सुरू होणार? या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना हवी आहेत.
अपघात झाल्यानंतरच जाग येणार का? : दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरून जात असताना एखाद्या दुचाकीस्वाराचा तोल जाऊन दुर्घटना झाली, शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थितीत जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहून प्रशासन कारवाई करणार आहे का, की त्यापूर्वीच उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती केली जाणार? असा थेट सवाल आता नांदेडकर विचारत आहेत.
विकासाच्या घोषणा मोठ्या, पण प्रमुख उड्डाणपुलाची दुरवस्था कायम! : शहर विकासाच्या घोषणा, कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि नवीन कामांची उद्घाटने होत असताना आधीपासून अस्तित्वात असलेल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या वाहतूक मार्गाची दुरुस्ती वर्षानुवर्षे प्रलंबित राहणे गंभीर बाब आहे. नांदेड शहराचा प्रमुख प्रवेशमार्ग असलेला मालटेकडी उड्डाणपूल अशा अवस्थेत किती दिवस ठेवणार? हा प्रश्न आता केवळ नागरिकांचा नसून संबंधित प्रशासन, बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर बोट ठेवणारा आहे.
नांदेडकरांचा थेट सवाल “दुरुस्तीला मुहूर्त कधी?” : मालटेकडी उड्डाणपुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करून उघड्या पडलेल्या भागाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, आवश्यक ती संरचनात्मक दुरुस्ती करावी आणि काम पूर्ण करण्यासाठी ठोस व कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. तीन वर्षे झाली उड्डाणपूल तसाच! लोकप्रतिनिधी आहेत, प्रशासन आहे, विभाग आहेत मग दुरुस्तीला नेमका अडथळा कोणाचा?
Leave a Reply