उड्डाणपुलाच्या कामात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा; वारंवार निवेदने, बातम्या प्रसिद्ध होऊनही प्रशासन सुस्तच! नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणार कोण?
नांदेड (शेख मुख्तार) : नांदेड शहरातील हिंगोली गेट ते बाफना चौक, बरकत कॉम्प्लेक्स, देगलूर नाका चौक ते वाजेगाव या मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेकडून अपेक्षित उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे, वाहनांमुळे उडणारी धूळ आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. शनिवारी मध्यरात्री बाफना चौकात घडलेल्या अपघाताने या परिस्थितीचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आणले आहे.
शनिवारी मध्यरात्री बाफना चौक येथे एका ट्रकने एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर हा ट्रक घटनास्थळी लावण्यात आलेल्या दोन्ही बाजूंच्या लोखंडी सुरक्षा पत्र्यांना तोडून दुसऱ्या बाजूला गेला आणि तेथील कारलाही जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात कोणाचाही मृत्यू झालेला नसला, तरी दुर्घटनेचे स्वरूप अत्यंत गंभीर होते. सुरक्षा पत्रे तोडून ट्रक दुसऱ्या बाजूला जाण्याची घटना घडत असेल, तर बांधकामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची परिणामकारकता किती, असा प्रश्न उपस्थित होतो. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली; मात्र भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाला आणखी किती इशारे मिळण्याची गरज आहे?
उड्डाणपुलाचे काम रस्त्याच्या मध्यभागी सुरू असताना दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीचा त्रास पादचारी, दुकानदार, परिसरातील रहिवासी तसेच लहान मुलांना सहन करावा लागत आहे. नियमित पाणी फवारणी, खड्ड्यांची दुरुस्ती, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि योग्य दिशादर्शक फलक यांसारख्या मूलभूत उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. विकासकामाच्या नावाखाली नागरिकांना अशा असुविधा आणि धोक्यांचा सामना करावा लागणे कितपत योग्य आहे?
या मार्गावरील समस्यांबाबत जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहेत. प्रसारमाध्यमांनीही वारंवार बातम्यांच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारींकडे आणि प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे प्रशासन एवढे दुर्लक्ष का करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. प्रशासनाला अपघात होण्यापूर्वीच उपाययोजना करता येत नाहीत का? संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे का? कंत्राटदाराकडून सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी कोण करणार? या प्रश्नांची उत्तरे आता नागरिकांना हवी आहेत.
उड्डाणपुलाचे काम शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असले, तरी काम करताना वर्क ऑर्डरमधील अटी आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी मजबूत व सुरक्षित बॅरिकेडिंग, पुरेशी प्रकाशव्यवस्था, दिशादर्शक फलक, वाहतुकीचे योग्य नियोजन, खड्ड्यांची दुरुस्ती आणि धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे. कंत्राटदाराला काम देऊन प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. कामावर देखरेख ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे ही संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करण्यात यावे आणि त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी.
बाफना चौकातील अपघात ही संबंधित प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. आज सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र उद्या अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची खात्री कोण देणार? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ निवेदनांपुरता किंवा कागदोपत्री पाहणीपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जिल्हाधिकारी, महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि संबंधित बांधकाम यंत्रणेने तातडीने संयुक्त पाहणी करून या मार्गावरील धोकादायक परिस्थिती दूर करावी. नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी. शेवटी प्रश्न एकच आहे, उड्डाणपूल नागरिकांच्या सोयीसाठी बांधला जात आहे की नागरिकांना रोजच्या प्रवासात धोक्याचा सामना करावा लागावा म्हणून? विकासकामे जरूर करा; पण नागरिकांच्या सुरक्षिततेची किंमत मोजून नव्हे! प्रशासनाने आता तरी कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन प्रत्यक्ष कृती करावी, अशी तीव्र मागणी नांदेडकरांतून होत आहे.

Leave a Reply