चैतन्यनगर परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीती; सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला, पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर २४ तासांतच घटना
नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील चैतन्यनगर आणि परिसरात शनिवारी पहाटे गुन्हेगारी घटनांची मालिका समोर आली. अवघ्या एका तासाच्या आसपासच्या कालावधीत पाच नागरिकांना लक्ष्य करून लुटमार आणि जबरी चोरीचे प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी बी. एम. बनसोडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बी. एम. बनसोडे हे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून पहाटे ४.१५ ते ५.१५ या वेळेत नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी जातात. शनिवारीही नेहमीप्रमाणे ते घराबाहेर पडले होते. गाडगेबाबा चौक परिसरात दुचाकीवरून आलेल्या आणि चेहऱ्यावर पट्ट्या बांधलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्लेखोरांनी त्यांच्या खिशांची झडती घेतली; मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याचे समोर आले. त्यानंतरही उजव्या हातावर वार करून त्यांना खाली पाडण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. साईबाबा मंदिरासमोरील रोहित किराणा दुकानाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. हल्ल्याची तीव्रता घटनास्थळावरील रक्ताच्या खुणांवरून दिसून येत होती. दुकानाच्या पायरीवर तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. घटनास्थळापासून यशोधरा हॉस्पिटलपर्यंतच्या सुमारे १५० मीटर अंतरावर रक्ताचे डाग आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
बनसोडे यांच्यावरील हल्ल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत देशमुख जिमसमोर आणखी एका तरुणाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सिद्धार्थनगर-सावंगी पाटीजवळ सोनवणे नावाच्या ट्रॅक्टरचालकाला लक्ष्य करण्यात आले. त्याच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. चौथी घटना आसना नदीच्या पुलाजवळ घडली. भाजीपाला विक्रीसाठी कोथिंबीर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला अडवून त्याच्याकडील कोथिंबीर, मोबाईल आणि ८०० रुपये लुटल्याची माहिती आहे. पाचवी घटना रेल्वे डिव्हिजन कार्यालयासमोर घडली. येथे एका दुचाकीस्वाराला धडक देऊन खाली पाडण्यात आले. अशा प्रकारे एकाच पहाटे पाच वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांच्या तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
या घटनांमधील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे, आसना गार्डन परिसरात पहाटे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी आसना मॉर्निंग वॉक ग्रुपने यापूर्वीच केली होती. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना निवेदन देण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे निवेदन दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत चैतन्यनगर परिसरात लुटमारीच्या घटनांची मालिका घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. शहरात पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार आणि व्यावसायिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रमुख चौकांसह अंतर्गत रस्त्यांवर पहाटेच्या वेळी पोलीस गस्त वाढवणे, संशयित दुचाकीस्वारांची तपासणी करणे, सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि घटनांमधील आरोपींचा तातडीने शोध घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, नागरिकांनीही पहाटे एकटे बाहेर पडणे टाळावे, शक्यतो पुरेसा उजेड झाल्यानंतरच फिरायला जावे आणि अनावश्यक रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नयेत, अशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी निवेदन दिल्यानंतरही अशा घटना घडत असतील, तर पहाटेच्या गस्तीचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याची गरज आहे. चैतन्यनगरमधील या घटनांतील आरोपींना तातडीने अटक करून नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्याचे मोठे आव्हान आता नांदेड पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
Leave a Reply