📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

देगलूर नाका परिसरात महावितरणचा भोंगळ कारभार? अनधिकृत कर्मचाऱ्यांकडून भरवस्तीत सुरू लाईनवर काम!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

वरिष्ठ अधिकारी झोपेत आहेत का?

नांदेड (शेख मुख्तार) : शहरातील चौफाला युनिट अंतर्गत देगलूर नाका युनिटच्या हद्दीत येणाऱ्या हिलाल नगर परिसरातील डीपी क्रमांक ६४ येथे महावितरणच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारे चित्र समोर आले आहे. कोणतीही अधिकृत परवानगी किंवा आवश्यक सुरक्षा साधने असल्याचे स्पष्ट न दिसता काही अनधिकृत कर्मचारी थेट सुरू असलेल्या विद्युत वाहिनीवर सर्व्हिस वायर बदलण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार केवळ नियमांचे उल्लंघन आहे की नागरिकांच्या आणि कामगारांच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात काही अनधिकृत व्यक्तींकडून विद्युतविषयक कामे केली जात असून, या कामांसाठी ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार संबंधित कनिष्ठ अभियंता (जे.ई.) यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचीही चर्चा परिसरात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.

वीज वाहिनीवर काम करताना नियमानुसार विद्युत पुरवठा बंद करणे, अधिकृत कर्मचाऱ्यांची नियुक्ती, आवश्यक सुरक्षा उपकरणांचा वापर आणि वरिष्ठांची परवानगी या बाबींना अत्यंत महत्त्व आहे. असे असताना सुरू असलेल्या लाईनवर सर्व्हिस वायर बदलण्याचे काम नेमके कोणाच्या आदेशाने केले जात आहे? संबंधित व्यक्ती महावितरणचे अधिकृत कर्मचारी आहेत का? त्यांच्याकडे विद्युत कामाचा आवश्यक परवाना आणि सुरक्षा साधने आहेत का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. संबंधित परिसरात कामाच्या नावाखाली कोणत्याही वेळी वीजपुरवठा बंद केला जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. ग्राहकांकडून पैसे घेऊन कामे केली जात असतील, तर त्याचा अधिकृत पावती व कामाच्या नोंदींमध्ये उल्लेख आहे का, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौफाला युनिटचे वरिष्ठ अधिकारी तसेच महावितरणच्या विभागीय आणि मंडळस्तरीय अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे. डीपी क्रमांक ६४ परिसरात सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित व्यक्तींची अधिकृत नियुक्ती, कामाचे आदेश, सुरक्षा नियमांचे पालन आणि ग्राहकांकडून आकारण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी. अनधिकृत व्यक्तींकडून विद्युत कामे केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच या प्रकारात कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांचीही जबाबदारी निश्चित करावी. हिलाल नगरमधील डीपी क्रमांक ६४ येथील हा प्रकार महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा विषय असल्याने केवळ कागदी चौकशी न करता प्रत्यक्ष कारवाई होणे आवश्यक आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करतात की संबंधितांना अभय देतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!