📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

हेल्मेटधारकांचे पोलिसांकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

गांधीगिरीच्या माध्यमातून तामसात रस्ता सुरक्षेचा संदेश; विनाहेल्मेट वाहनचालकांना जनजागृतीचा सल्ला

तामसा (अर्जुन जोशी ) : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव वाहनधारकांना करून देण्यासाठी तामसा पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला. रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिमेअंतर्गत हेल्मेट घालून वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (दि. १६) तामसा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर आणि महामार्ग पोलीस अर्धापूरचे पोलीस उपनिरीक्षक जलाल अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. यावेळी हेल्मेट परिधान करून दुचाकी चालविणाऱ्या वाहनधारकांना पोलिसांनी थांबवून गुलाबपुष्प देत त्यांच्या शिस्तबद्ध वाहनचालकाचे कौतुक केले. पोलिसांकडून मिळालेल्या या अनपेक्षित सन्मानामुळे अनेक वाहनधारकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. दरम्यान, विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनाही पोलिसांनी केवळ कारवाई किंवा दंडापुरते मर्यादित न राहता रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. हेल्मेट हे पोलिसांची कारवाई किंवा दंड टाळण्यासाठी नव्हे, तर अपघाताच्या वेळी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. दुचाकी अपघातांमध्ये डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीमुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षेसोबतच आपल्या कुटुंबाचा विचार करून घराबाहेर पडताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर यांनी केले. पोलिसांनी राबविलेल्या या अभिनव जनजागृती उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी कौतुक केले. दंडाच्या भीतीपेक्षा जनजागृतीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत महामार्ग पोलीस कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल सचिन मुस्तापुरे, डीएसबी प्रमुख प्रकाशक कबले तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!