📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

हायमॅक्स बंदच; तामसातील दोन प्रमुख चौक अंधारात!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

उद्घाटनाचा गाजावाजा झाला, नारळ फुटला; काही दिवसांतच रोषणाई गुल!

सण-उत्सवाच्या काळात मुख्य मार्ग अंधारात; छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दिवे सुरू करण्याची नागरिकांची जोरदार मागणी

तामसा (अर्जुन जोशी) : तामसा शहराच्या विकासाची रोषणाई दाखवत मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या हायमॅक्स दिव्यांची अवस्था आज मात्र “दिवे लावले, पण प्रकाश कुठे?” अशी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग 752(आय) अंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जुना बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेले हायमॅक्स दिवे बंद असल्याने दोन्ही प्रमुख चौक पुन्हा अंधाराच्या विळख्यात सापडले आहेत. तत्कालीन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते या हायमॅक्स दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनावेळी मोठा गाजावाजा झाला; तामसाच्या विकासाला रोषणाईची नवी दिशा मिळाल्याचे चित्र उभे करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर काही दिवसांतच दिवे बंद पडल्याने विकासाच्या या रोषणाईचा प्रकाश किती दिवस टिकला, हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

उद्घाटन झाले; देखभाल मात्र कुणाची? : शहरातील प्रमुख चौकांमध्ये रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था राहावी आणि नागरिकांची सुरक्षितता वाढावी, या उद्देशाने हायमॅक्स दिवे बसविण्यात आले. मात्र दिवे बंद पडल्यानंतर त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शुभारंभाच्या वेळी नारळ फोडण्यासाठी यंत्रणा तत्पर; पण बंद दिवे सुरू करण्यासाठी एवढा विलंब का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सण-उत्सवातच मुख्य चौक अंधारात! : तामसा शहरातील हे दोन्ही चौक अत्यंत वर्दळीचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांच्या सततच्या वर्दळीचा परिसर आहे. सण-उत्सवाच्या काळात शहरातील मुख्य मार्ग आणि चौक रोषणाईने उजळलेले असणे अपेक्षित असताना प्रमुख चौकांतील हायमॅक्स बंद असल्याने नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. अंधारामुळे वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महामार्गाच्या दुभाजकातील स्ट्रीटलाईटही शोभेची वस्तू? : तामसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात बसविण्यात आलेल्या स्ट्रीटलाईटची अवस्थाही समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली प्रकाशयंत्रणा जर नियमितपणे कार्यरत नसेल, तर या यंत्रणेचा उपयोग नेमका कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी उभारलेल्या दिव्यांनी प्रत्यक्षात रस्ता उजळायला हवा; मात्र तेच दिवे बंद राहणार असतील तर ते केवळ “शोभेची वस्तू” बनून राहणार नाहीत का?

आमदारांचा पाठपुरावा; प्रशासन मात्र ढिम्म? : बंद हायमॅक्स दिवे सुरू करण्याबाबत विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे संबंधित विभागाकडे लक्ष वेधण्यात आल्याचे नागरिक सांगतात. आमदारांनी भ्रमणध्वनीद्वारे संबंधित विभागाशी संपर्क साधूनही प्रत्यक्षात दिवे सुरू झाले नसतील, तर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यालाही प्रशासनाकडून किंमत नाही का? असा संतप्त सवाल आता पुढे येत आहे. लोकप्रतिनिधी प्रश्न मांडतात, नागरिक तक्रारी करतात, पाठपुरावा केला जातो; तरीही दिवे बंदच राहतात. मग जबाबदारीची ही साखळी नेमकी कुठे तुटते? याचे उत्तर संबंधित विभागाने तामसा शहरातील नागरिकांना द्यावे.

“राजापेक्षा प्रधान शहाणा?” — तामसात चर्चेला उधाण : लोकप्रतिनिधींकडून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही जर प्रत्यक्ष काम होत नसेल, तर “राजापेक्षा प्रधान शहाणा” ही म्हण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर लागू पडते का, अशी उपरोधिक चर्चा आता तामसा शहरात रंगू लागली आहे. नागरिकांना उद्घाटनाचे फोटो नकोत; त्यांना रात्रीच्या अंधारात प्रकाश हवा आहे. नारळ फोडण्याचे सोहळे नकोत; बंद पडलेली यंत्रणा पुन्हा सुरू झालेली पाहिजे. विकासाच्या घोषणा नकोत; रस्त्यावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे.

आता तरी दिवे सुरू होणार का? : तामसा शहरातील दोन प्रमुख चौक अंधारात असताना संबंधित विभाग आणखी किती दिवस मौन बाळगणार? हायमॅक्स दिव्यांची दुरुस्ती कधी होणार? महामार्ग दुभाजकातील बंद स्ट्रीटलाईट कधी सुरू होणार? आणि नागरिकांना प्रकाशासाठी आणखी किती पाठपुरावा करावा लागणार? या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. तामसाच्या नागरिकांची मागणी स्पष्ट आहे उद्घाटनाचा गाजावाजा पुरे झाला; आता बंद हायमॅक्स आणि स्ट्रीटलाईट तातडीने सुरू करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!