📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

दुर्गंधीयुक्त कचऱ्याची उघड्यावर धोकादायक वाहतूक; तीन हायवांवर गुन्हा

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

चालक-मालकांसह संबंधित कचरा डेपोवाल्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; वैध परवानाही आढळला नाही

नांदेड (शेख मुख्तार) : उघड्यावर कोणतीही ताडपत्री न झाकता दुर्गंधीयुक्त कचऱ्याची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या तीन हायवा वाहनांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या वाहनांमधून कचरा वाहतूक करताना रस्त्यावर चिखल व कचरा सांडत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची परिस्थिती आढळून आली. या प्रकरणी तीन हायवा वाहनांचे चालक, मालक तसेच संबंधित कचरा डेपोवाल्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे (डीबी पथक) कर्मचारी १६ सप्टेंबर रोजी रात्री गस्त घालत असताना सिडकोकडून येणारी काही हायवा वाहने पोलिसांच्या निदर्शनास आली. या वाहनांमध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त कचरा वरपर्यंत भरलेला होता. विशेष म्हणजे कचऱ्यावर कोणतीही ताडपत्री झाकण्यात आलेली नव्हती. कचऱ्यात पॉलीथिन, कपड्यांचे तुकडे, माती आदी मिश्रित असल्याचे आढळून आले. वाहतुकीदरम्यान चिखल रस्त्यावर सांडत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. पोलिसांनी सदर वाहने आरटीओ कार्यालयासमोर थांबवून चालक व मालकांची चौकशी केली. चौकशीदरम्यान चालकांकडे कचरा वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळून आला नसल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील चौकशीत हा दुर्गंधीयुक्त कचरा महानगरपालिका डम्पिंग डेपोमधून डेरला फाटा येथील खदाणीत विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत हायवा क्रमांक MH 26 DB 7717 चा चालक प्रज्वल सदाशिव दुधमल (वय 21, रा. धानोरा, ता. पूर्णा, जि. परभणी) व वाहन मालक गजानन किसनराव हंबर्डे (रा. विष्णुपुरी, ता. जि. नांदेड) यांचा समावेश आहे. तसेच हायवा क्रमांक MH 01 CV 2397 चा चालक शिवलींग संभाजी संगेकर (वय 36, रा. लालवाडी, ता. जि. नांदेड) व वाहन मालक पवन पांडुरंग काळे (रा. जुना कौठा, ता. जि. नांदेड) यांच्यावरही कारवाई करण्यात आली. तर हायवा क्रमांक MH 40 BL 6105 चा चालक नरहरी नामदेव धुतराज (वय 49, रा. जानापुरी, ता. लोहा, जि. नांदेड) आणि वाहन मालक सदानंद संजय पुयड (रा. पुणेगाव, ता. जि. नांदेड) यांची नावे पोलिसांनी नमूद केली आहेत.

मानवी जीवितास व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशा प्रकारे उघड्यावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याची वाहतूक केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ व २८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक आनंद चव्हाण तसेच पोलीस अंमलदार राजु जेंकुट, गुरुनाथ कारामुंगे, जमीर, जाधव आणि हनवता कदम यांच्या पथकाने केली. दरम्यान, सार्वजनिक रस्त्यांवर मानवी आरोग्यास व जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे उघड्यावर कचरा, मलबा किंवा धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नांदेड पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!