आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट होणार ग्रामपंचायतींचे राजकीय चित्र; दावेदारांचे लक्ष तहसील कार्यालयाकडे
तामसा (अर्जुन जोशी) : हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे तामसा परिसरातील ग्रामपंचायतींसह इच्छुक पदाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष लागले आहे. आरक्षणाचा प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर अनेक गावांतील आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले जाते. हदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पार पडणार आहे. त्यामुळे आरक्षणाची सोडत कोणत्या गावासाठी कोणत्या प्रवर्गात होते, याची उत्सुकता इच्छुकांसह ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या तामसा ग्रामपंचायतीच्या आरक्षणाकडेही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. यापूर्वी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथमच सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले होते. त्यामुळे त्यावेळी गावातील प्रचलित राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले होते. आता आगामी आरक्षण सोडतीत कोणता प्रवर्ग निश्चित होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून तामसा परिसरात संभाव्य उमेदवारांकडून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. विविध राजकीय गटांमध्ये बैठका, चर्चा आणि मतदारांशी संपर्क वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. अनेक इच्छुकांनी आपापल्या पातळीवर जनसंपर्क वाढवून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होते, यावर अनेक इच्छुकांच्या राजकीय तयारीची दिशा ठरणार आहे. आरक्षण अनुकूल ठरल्यास काही दावेदारांच्या हालचालींना अधिक वेग येऊ शकतो, तर अपेक्षित प्रवर्ग न आल्यास काहींना आपल्या राजकीय रणनीतीत बदल करावा लागू शकतो.
आरक्षण सोडतीपूर्वी गावागावांत संभाव्य प्रवर्गाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असल्या, तरी या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रत्यक्ष सोडत झाल्यानंतरच सरपंचपदाचे आरक्षण स्पष्ट होणार असून त्यानंतरच निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि राजकीय समीकरणांचे चित्र समोर येईल.
त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीनंतर कोणत्या इच्छुकांच्या राजकीय तयारीला बळ मिळते आणि कोणाला नव्या पर्यायांचा विचार करावा लागतो, याकडे तामसा परिसरातील नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply