छावा मराठा युवा महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचीही मागणी
नांदेड (शेख मुख्तार) : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुदखेड आणि मुखेड तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत तातडीने समावेश करावा, अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, नांदेड जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद यांसह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, कर्ज काढून केलेली पेरणी वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मुदखेड आणि मुखेड तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही त्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून, जनावरांसाठी चारा उपलब्धतेची परिस्थितीही गंभीर होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
एकरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना पंचनाम्याची अट न लावता एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणीही छावा मराठा युवा महासंघाने केली आहे. मुदखेड व मुखेड तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर प्रदीप पाटील हुंबाड (जिल्हाप्रमुख, नांदेड), विक्रम पाटील बामणीकर (उपजिल्हाप्रमुख, नांदेड), श्रीकांत पाटील बसवदे (युवा जिल्हाध्यक्ष, नांदेड), व्यंकटराव पाटील कौसल्ये (तालुकाप्रमुख, कंधार) आणि पंकज भाऊ कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply