📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

बातमीचा इफेक्ट : ‘स्वच्छ नांदेड’च्या दाव्यानंतर इतवारा झोनमध्ये घाणीवर पांढरा चुना!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

बातमी प्रसिद्ध होताच महापालिकेची धावपळ; अस्वच्छ ठिकाणी थातूरमातूर रंगरंगोटी, मात्र झोन कार्यालयातील घाणीचे प्रश्न कायम

नांदेड (शेख मुख्तार) : ‘स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड’चा दावा करणाऱ्या नांदेड महानगरपालिकेच्या इतवारा झोन कार्यालयातील अस्वच्छतेचे चित्र समोर आणणारी बातमी प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत आहे. कार्यालय परिसरातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि अस्वच्छता दिसत होती, त्या भागात आता पांढरा चुना लावून स्वच्छतेचा देखावा करण्यात आला आहे.
यापूर्वी इतवारा झोन कार्यालयातील भिंतीलगत साचलेला कचरा, घाणीचे डाग आणि अस्वच्छ परिसराचे छायाचित्र समोर आले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणी तातडीने चुना लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे बातमीचा परिणाम म्हणून प्रशासनाने हालचाल केली, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, फक्त घाणीच्या ठिकाणी पांढरा चुना लावून प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण इतवारा झोन कार्यालयाच्या इतर भागांतही अस्वच्छतेची चिन्हे दिसून येत असून, परिसराची नियमित साफसफाई आणि देखभाल करण्याची गरज असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज असलेल्या या कार्यालयात नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा सार्वजनिक कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.

‘चुना’ नव्हे, कायमस्वरूपी स्वच्छता हवी! : एका ठिकाणी चुना लावून अस्वच्छतेचा डाग झाकण्यापेक्षा संपूर्ण झोन कार्यालयाची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, भिंतींची देखभाल आणि नियमित साफसफाई याकडे महापालिकेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर झालेली ही तातडीची कारवाई स्वागतार्ह असली, तरी इतवारा झोन कार्यालयाला खऱ्या अर्थाने स्वच्छ करण्यासाठी केवळ दिखावा न करता कायमस्वरूपी स्वच्छता व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. फोटोतील फरकच सांगतोय बातमीचा परिणाम झाला; आता प्रश्न आहे, स्वच्छता कायम राहणार की पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!