रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेल्या टीन शेडच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा; जड वाहनांना पर्यायी मार्ग देण्याचीही मागणी
नांदेड (शेख याहीया) : बाफना टी पॉइंट ते देगलूर नाका या प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेल्या टीन शेडच्या कामामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ता अरुंद झाला असून, या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यासह रात्रीच्या वेळी सुरक्षिततेसाठी तात्पुरती प्रकाशव्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या देगलूर नाका येथील अल्पसंख्याक सेलचे ब्लॉक अध्यक्ष अब्दुल रहीम पटेल यांनी यासंदर्भात नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र निवेदने सादर केली आहेत.
रात्रीच्या अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न : रस्त्यावर विभाजकाचे पोल काढण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण होत असल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, या परिसरात लुटमारीच्या घटना घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते विभाजक पोल अथवा पथदिवे उभारून तातडीने प्रकाशव्यवस्था सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची मागणी : दरम्यान, बाफना टी पॉइंट येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी झाली आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, जड वाहनांची वर्दळ असल्याने समस्या अधिकच वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर बाफना टी पॉइंट ते वाजेगाव पोलीस चौकीदरम्यान जड वाहनांसाठी तात्पुरता वाहतूक प्रतिबंध लागू करून त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची अपेक्षा : रस्त्याची दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियोजन या तीनही बाबींवर प्रशासनाने समन्वयाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अब्दुल रहीम पटेल यांनी केली आहे. आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी कधी करते आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply