समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविताना नियंत्रण सुटले; दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, ‘शेरू’ किरकोळ जखमी
तामसा (अर्जुन जोशी) : कांडली येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेचा तपास करण्यासाठी नांदेडहून तामसाकडे निघालेल्या डॉग स्कॉडच्या पोलीस वाहनाला शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पिंपराळा परिसरात भीषण अपघात झाला. नटराज जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्याजवळील वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि पोलीस वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे चार फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळले. या अपघातात वाहनचालकासह दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून डॉग स्कॉडमधील ‘शेरू’ हा श्वान किरकोळ जखमी झाला आहे.
कांडलीतील घरफोडीच्या तपासासाठी श्वानपथक रवाना :तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांडली येथे साईनाथ बहिरवाड यांच्या घरात १ ऑक्टोबरच्या रात्री चोरीची घटना घडली. रात्री सुमारे ११ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाट फोडले. यावेळी घरातील सुमारे १९ हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तामसा पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. चोरट्याचा माग काढण्यासाठी नांदेड येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानुसार श्वानतज्ज्ञ आणि ‘शेरू’ या प्रशिक्षित श्वानासह पोलीस वाहन नांदेडहून तामसाच्या दिशेने रवाना झाले.
दुचाकीला वाचविताना वाहन खड्ड्यात कोसळले : डॉग स्कॉडचे वाहन पिंपराळा परिसरातील नटराज जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्याजवळ पोहोचले असता वळणावर समोरून एक दुचाकी आल्याचे सांगण्यात येते. दुचाकीला धडक टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन सुमारे चार फूट खोल खड्ड्यात कोसळले. अपघाताची तीव्रता एवढी होती की वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनातील पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांसह नागरिकांनी केले मदतकार्य : अपघाताची माहिती मिळताच तामसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाईकराव, वाहनचालक किरण डोरले, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल लोखंडे, करण वाघमारे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय सोमेवाड, सुनील बोईनवाड, अमोल कंठाले आणि सचिन पवार यांनी मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहनातून जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तातडीने तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दोघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले : या दुर्घटनेत पोलीस वाहनचालक रमेश शिवाजी नागरगोजे (बक्कल क्र. २९९३) आणि श्वानतज्ज्ञ माधव देवाजी पल्लेवाड (बक्कल क्र. ३१६८) हे गंभीर जखमी झाले. तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर दोन्ही जखमी पोलिसांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील विष्णुपुरी रुग्णालयात हलविण्यात आले.
‘शेरू’ किरकोळ जखमी; प्रकृती स्थिर : अपघातात डॉग स्कॉडचा प्रशिक्षित श्वान ‘शेरू’ यालाही किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर त्याला तामसा पोलीस ठाण्यात सुरक्षित आणण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कबले आणि पोलीस कॉन्स्टेबल मुदशीर खान यांनी ‘शेरू’ची काळजी घेत त्याला अन्न-पाणी दिले. सध्या ‘शेरू’ची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कांडलीतील चोरीचा तपास करण्यासाठी निघालेले डॉग स्कॉडचे पथकच अपघाताला बळी पडल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply