महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान; आठवडी बाजारासह महामार्ग परिसरातील कचऱ्याची केली साफसफाई
तामसा (अर्जुन जोशी) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त तामसा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सफाई कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तब्बल चार तास श्रमदान केले. अभियानाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. गटविकास अधिकारी दशरथ आडेराव यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली.
यानंतर तामसा शहरातील आठवडी बाजार परिसर, अंगणवाडी परिसर तसेच राष्ट्रीय महामार्गालगतच्या दुभाजकातील कचरा हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. विविध ठिकाणी साचलेला कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून शहराबाहेर नेण्यात आला. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले.
या अभियानात विस्तार अधिकारी मुंडकर, बाळासाहेब पवार, ग्रामपंचायतीचे प्रशासक गिरीधर मोळके, ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड, कर्मचारी संभाजी हेंबाडे, अमित मोपलवार, किसन कोठूले, तेजस लाहेवार यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सफाई कामगार सहभागी झाले होते.
एक दिवस नव्हे, वर्षभर स्वच्छतेवर भर आवश्यक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेले श्रमदान हे स्वच्छतेचा संदेश देणारे असले तरी सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता नियमित राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. कचरा व्यवस्थापन, वेळेवर कचरा संकलन आणि नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केल्यास तामसा शहर अधिक स्वच्छ ठेवता येईल. त्यामुळे अशा उपक्रमांना केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर सातत्याने स्वच्छता उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply