📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक; मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी

नांदेड (शेख मुख्तार) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने नांदेड शहरात मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहोचला. यावेळी महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवर तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देशभरातील विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. ६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतही इंडिया आघाडीच्या खासदारांनी याच मागणीसाठी आंदोलन केले होते. नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात खासदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे रऊफ जमीनदार यांच्यासह पंकज कांबळे, निखिल नाईक, सय्यद सद्दाम, शेख वसीम, खदीर कुरेशी, सरदार भाई, कामरान खान, हाजी भाई आदी पदाधिकारी सहभागी झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचीही यावेळी उपस्थिती होती.

मोर्चादरम्यान निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत घोषणाबाजी करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारयादीतील बदल आणि SIR प्रक्रियेबाबत विरोधकांनी आक्षेप नोंदवत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, महाराष्ट्रातही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून महाविकास आघाडीसह विविध विरोधी पक्षांकडून आंदोलनाची भूमिका घेतली जात आहे.

मुंबईत ५ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सहभागाने मोर्चा काढण्यात आला होता. नांदेडमधील मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापले होते. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पुढे रेटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!