📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

लिटल दानिश यांच्या कार्यक्रमावरून नांदेडमध्ये राजकीय खळबळ! MIM आणि BJP ची निवेदने जवळपास सारखी; हा योगायोग की राजकीय सोय?

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

फारुख अहमद यांच्या कार्यक्रमाला विरोध; दोन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकाच मुद्द्यावर आक्रमक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

नांदेड (शेख मुख्तार) : नांदेडच्या राजकारणात सध्या एका कार्यक्रमावरून नवा चर्चेचा विषय समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीशी संबंधित फारुख अहमद यांनी तरुणाईच्या आग्रहाखातर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लिटल दानिश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा पुढाकार घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कार्यक्रमाला विरोध करत एमआयएम आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही निवेदनांमधील मुद्दे आणि मांडणी जवळपास सारखी असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहे की, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना विरोधाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांची भूमिका इतकी मिळतीजुळती कशी?

उपलब्ध निवेदनांनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी नांदेडमधील देगलूर नाका परिसरातील बडी ईदगाह मैदान येथे लिटल दानिश यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे नगरसेवक मोहम्मद अल्ताफ हुसेन आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी अन्वर हुसेन ऊर्फ अन्नूभाई यांच्या लेटरहेडवरून पोलीस प्रशासनाला निवेदने देण्यात आल्याचे छायाचित्रांवरून दिसते. या निवेदनांमध्ये बडी ईदगाह मैदान हे मुस्लिम समाजासाठी श्रद्धेचे आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्याने धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असून, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्रमाला परवानगी देऊ नये आणि परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राजकारणात प्रत्येक पक्षाची स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र राजकीय भूमिका आणि स्वतंत्र मतदारवर्ग असतो. मात्र, नांदेडमधील या प्रकरणात दोन वेगवेगळ्या पक्षांकडून एकाच कार्यक्रमाला विरोध झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. एका बाजूला एमआयएम, तर दुसऱ्या बाजूला भाजप! राजकीय व्यासपीठावर अनेक मुद्द्यांवर परस्परविरोधी भूमिका घेणारे हे पक्ष एका स्थानिक कार्यक्रमाच्या मुद्द्यावर मात्र एकाच दिशेने उभे असल्याचे चित्र दिसत आहे. मग हा केवळ योगायोग आहे, की या विरोधामागे काही समान राजकीय गणित आहे?

राजकारणातील समान धागा नेमका कोणता? या संपूर्ण प्रकरणातील चर्चेचा केंद्रबिंदू केवळ कार्यक्रमाला विरोध हा नाही, तर दोन वेगवेगळ्या पक्षांकडून जवळपास एकाच धर्तीची निवेदने दिली जाणे हा आहे. राजकीय मैदानात एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे पक्ष एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर एकाच भूमिकेत दिसले, तर नागरिकांनी प्रश्न विचारायचेही नाहीत का? धार्मिक भावना आणि कायदा-सुव्यवस्था हे निश्चितच संवेदनशील विषय आहेत. त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. त्याच वेळी, कोणत्याही कार्यक्रमाला विरोध करताना वस्तुस्थिती, कार्यक्रमाचे स्वरूप आणि कायदेशीर निकष यांच्या आधारे निर्णय होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

आतून सगळे एकच आहेत, असा निष्कर्ष काढण्याआधी पुरावे तपासणे गरजेचे; पण राजकारणातील या समान धाग्याबद्दल प्रश्न विचारणेही तितकेच आवश्यक! हा निव्वळ योगायोग की राजकीय सोयीचा समान धागा? उत्तर काळच देईल; पण प्रश्न मात्र चर्चेत राहणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!