📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नवीन रेशन दुकान वाटपात स्थानिक संस्थांना प्राधान्य द्या!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे दासराव बापुराव पुयड यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात शासनामार्फत नवीन रास्त भाव धान्य (रेशन) दुकानांचे वाटप करताना स्थानिक सहकारी संस्था, स्थानिक सेवाभावी संस्था, बचतगट तसेच गावातील पात्र स्थानिक रहिवाशांना नियमानुसार प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दासराव बापुराव पुयड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नवीन रेशन दुकानांचे वाटप करताना संबंधित गावातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, नागरिकांच्या गरजा आणि रेशनधारकांना येणाऱ्या अडचणी यांचा प्रत्यक्ष विचार होणे आवश्यक आहे. गावातील परिस्थितीची माहिती स्थानिक संस्था आणि रहिवाशांना अधिक चांगल्या प्रकारे असल्याने त्यांना प्राधान्य दिल्यास सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे काम अधिक सुलभ आणि प्रभावी होऊ शकते.

नवीन रेशन दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत आणि योग्य पद्धतीने धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पात्र स्थानिक सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, बचतगट आणि स्थानिक रहिवाशांच्या अर्जांचा पारदर्शक पद्धतीने विचार करण्यात यावा. तसेच बाहेरील अर्जदारांची निवड करण्यापूर्वी संबंधित गावातील पात्र स्थानिक अर्जदारांच्या दाव्यांचा नियमानुसार विचार करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. स्थानिक पात्र संस्थांना किंवा रहिवाशांना संधी दिल्यास गावातील नागरिकांच्या गरजेनुसार रेशन वितरणाचे नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सेवा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात नवीन रास्त भाव धान्य दुकानांचे वाटप करताना संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन स्थानिक पात्र संस्थांना व रहिवाशांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती दासराव बापुराव पुयड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आता या मागणीवर जिल्हा प्रशासन आणि संबंधित पुरवठा विभाग काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!