स्वलिखित ‘तुमच्या श्रद्धेवर मला प्रश्न आहेत’ पुस्तक दिले भेट; विवेकवादी विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न
अंबड (प्रतिनिधी) : अंबड येथील युवा लेखक आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर पुरुषोत्तम नामदेव रेडे यांनी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (बाळासाहेब) तसेच राज्याचे मंत्री संजय सावकारे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी स्वतः लिहिलेले ‘तुमच्या श्रद्धेवर मला प्रश्न आहेत’ हे पुस्तक दोन्ही मान्यवरांना भेट दिले.
पुरुषोत्तम रेडे यांच्या या पुस्तकात मानवी विचारांवर सामाजिक संस्कारांचा होणारा परिणाम, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधील फरक, तसेच बुद्ध आणि अष्टावक्र यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासपूर्ण वेध घेण्यात आला आहे. यासोबतच मानवतावाद, उदारमतवाद आणि मानवी अस्तित्वाशी निगडित विविध प्रश्नांवरही पुस्तकातून विचारमंथन करण्यात आले आहे.
केवळ परंपरा म्हणून एखादी गोष्ट स्वीकारण्याऐवजी तिच्याकडे विवेकाच्या दृष्टीने पाहणे, स्वतः विचार करण्याची क्षमता विकसित करणे आणि प्रत्येक बाबीची तर्काच्या आधारे चिकित्सा करणे, हा या पुस्तकाचा प्रमुख विचार आहे. श्रद्धेच्या नावाखाली कोणत्याही गोष्टीचा आंधळेपणाने स्वीकार करण्यापेक्षा प्रश्न विचारण्याची आणि स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती समाजात रुजावी, हा संदेश या लेखनातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
समाजामध्ये विवेकवादी दृष्टिकोन विकसित व्हावा, वैचारिक देवाणघेवाण वाढावी आणि सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने आपण या सदिच्छा भेटी घेतल्याचे पुरुषोत्तम रेडे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान अजय खरात, आदित्य पुंड आणि युवराज शेळके उपस्थित होते. युवा लेखक म्हणून पुरुषोत्तम रेडे यांनी आपल्या लेखनातून सामाजिक आणि वैचारिक विषयांना दिलेले महत्त्व या निमित्ताने अधोरेखित झाले.
Leave a Reply