📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

मनाठा पोलीस ठाण्यात राष्ट्रपाल लोखंडे यांचे स्वागत; विलास चवळी यांना भावपूर्ण निरोप

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

अवघ्या १६ महिन्यांच्या सेवेनंतर बदली; अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण असल्याची चवळी यांनी व्यक्त केली खंत

हदगाव (सदानंद सोनाळे) : हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांचे स्वागत, तर बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांना निरोप देण्याचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

मनाठा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून विलास चवळी यांनी अवघ्या १६ महिन्यांच्या कालावधीत सेवा बजावली. बदलीनंतर त्यांना निरोप देताना त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. मनाठा पोलीस ठाणे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे असतानाही लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा मोठा ताण येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, याचे समाधान असल्याचे सांगत चवळी यांनी आपल्या कार्यकाळात काही चांगली कामे करता आली, याचा अभिमान असल्याचे नमूद केले. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामकाज करताना कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याची जाणीवही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आपल्या सहकाऱ्यांविषयी भावना व्यक्त करताना ते भावुक झाले.

दरम्यान, नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राष्ट्रपाल लोखंडे यांचे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखताना नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. या निरोप व स्वागत समारंभाला पोलीस पाटील, पत्रकार आणि सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक इंगोले यांनी केले.

मनाठा पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!