जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांचे निवेदन; निर्णय होईपर्यंत प्रस्तावित प्रकल्पाच्या पुढील कामांना स्थगिती देण्याची विनंती
नांदेड, प्रतिनिधी : अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित खासगी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर गावातील सर्व समाजांच्या स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा राखीव ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत संबंधित जमिनीवरील पुढील कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.
कामठा बुद्रुक येथील शासकीय गायरान जमीन गावाच्या सार्वजनिक उपयोगासाठी महत्त्वाची आहे. या जमिनीवर खासगी कंपनीमार्फत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित असल्याने भविष्यात गावातील विविध समाजांच्या स्मशानभूमीसाठी जागेची कमतरता निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्मशानभूमी ही गावातील सर्व समाजांची मूलभूत सार्वजनिक गरज असून, भविष्यात कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, यासाठी आवश्यक जागेचे नियोजन आताच करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मते, गावातील सर्व समाजांच्या अंत्यसंस्कारासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे गायरान जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी करण्यापूर्वी स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा निश्चित करून ती कायदेशीररीत्या राखीव ठेवण्यात यावी. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गावात जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
ग्रामसभा आणि कायदेशीर तरतुदींनुसार निर्णय घ्या : या प्रकरणात ग्रामस्थांची संमती, ग्रामसभेचा ठराव आणि सार्वजनिक हित यांचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित सौर प्रकल्पासाठी देण्यात आलेली शासकीय मंजुरी, जमीन वापराची परवानगी आणि संबंधित आदेशांची तपासणी करण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. स्मशानभूमीसाठी आवश्यक जागेचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आणि प्रकल्पाच्या मंजुरीची पडताळणी पूर्ण होईपर्यंत संबंधित जमिनीवरील पुढील कार्यवाही नियमानुसार तात्पुरती स्थगित ठेवण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लोकहिताचा विचार करण्याची मागणी : कामठा बुद्रुक येथील गायरान जमिनीचा वापर करताना गावातील सर्व समाजांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्यात यावे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेताना स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक सुविधेसाठी आवश्यक जागा उपलब्ध राहील, याची खात्री करावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांनाही देण्यात आल्या आहेत. आता या मागणीवर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते आणि स्मशानभूमीसाठी जागा राखीव ठेवण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे कामठा बुद्रुक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply