📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज द्या; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे बँकांना निर्देश

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

नांदेडमधील बँकांना अचानक भेट देत पीक कर्ज वितरणाचा घेतला आढावा; शेतकऱ्यांशी साधला संवाद

नांदेड (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. नांदेड शहरातील विविध बँकांना अचानक भेट देऊन त्यांनी पीक कर्ज वितरणाची सद्यस्थिती, प्रलंबित कर्ज प्रकरणे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवा मोंढा येथील भारतीय स्टेट बँक, वजीराबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक, तारासिंग मार्केट परिसरातील पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक यांना भेट दिली. यावेळी त्यांनी बँकांमध्ये पीक कर्जासाठी आलेले अर्ज, प्रलंबित प्रकरणे आणि कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच बँकेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांना त्रास देऊ नये. उपलब्ध ऑनलाइन सुविधांचा वापर करून सातबारा उतारा प्राप्त करावा आणि पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज मंजुरीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळी कर्ज उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे बँकांनी अर्जांची वेळेत छाननी करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीक कर्ज वितरणादरम्यान सामाईक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचीही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार योग्य पर्याय शोधून कर्ज वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय, बँकांकडे प्रलंबित असलेल्या कर्ज प्रकरणांची कारणे, शेतकऱ्यांकडून सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांमधील त्रुटी आणि त्यावर करता येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही त्यांनी घेतली. पीक कर्जासाठी आलेल्या अर्जांवर अनावश्यक विलंब न करता नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

शेतीच्या हंगामी गरजा पूर्ण करण्यासाठी पीक कर्ज महत्त्वाचे असते. त्यामुळे कर्ज वितरणातील विलंब टाळून पात्र शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बँकांनी गांभीर्याने पार पाडावी, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या अचानक भेटीमुळे पीक कर्ज वितरणाच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बँकांनी अधिक तत्परतेने काम करावे, यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!