लातूर (प्रतिनिधी) : महिला पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक विकास आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ महिला विंगच्या वतीने लातूर येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ झाला. औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स येथे झालेल्या उद्घाटन सोहळ्यामुळे राज्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या महिला पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका सुनंदाताई पवार, प्रसिद्ध वृत्तनिवेदिका व पत्रकार फराह खान आणि लातूर जिल्हा परिषद सदस्या आशा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
महिला पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी, बदलत्या माध्यमविश्वातील आव्हाने आणि भविष्यातील संधी यांवर चर्चा घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. उद्घाटन कार्यक्रमाला ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय संघटक व सर्व विंगप्रमुख रश्मी मारवाडी, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष संगम कोटलवार आणि महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला पत्रकार, पदाधिकारी आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात सहभाग नोंदविला.
अधिवेशनाच्या निमित्ताने ‘व्हॉईस ऑफ मीडिया वर्ल्ड’ या मुखपत्राच्या महिला पत्रकार अधिवेशन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकामध्ये महिला पत्रकारांचे अनुभव, त्यांची संघर्षमय वाटचाल, व्यावसायिक योगदान आणि त्यांनी मिळविलेल्या यशाचा आढावा घेण्यात आला आहे. कार्यकारी संपादक रश्मी मारवाडी आणि वैशाली पाटील यांनी महिला पत्रकारांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा शब्दांतून वेध घेतला आहे. महिला पत्रकारितेतील योगदानाची नोंद घेणारा हा विशेषांक अधिवेशनातील महत्त्वाचा उपक्रम ठरला.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या प्रारंभीच्या सत्रात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल, पत्रकारितेतील बदलते स्वरूप आणि महिलांसमोरील व्यावसायिक प्रश्न याविषयी सहभागी महिलांनी आपली मते मांडली. महिला पत्रकारांना एकत्र आणणारे व्यासपीठ, अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याची भावना बळकट करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना महिलांना विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, आरोग्यविषयक प्रश्न, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक स्पर्धा अशा अनेक बाबी त्यांच्या कार्यावर परिणाम करतात. या समस्यांवर सामूहिक चर्चा करून महिलांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे.
दोन दिवसांच्या या अधिवेशनात सहा ते आठ सत्रांच्या माध्यमातून महिला पत्रकारितेशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन आणि विचारमंथन होणार आहे. अनुभवी महिला मार्गदर्शकांच्या सहभागातून पत्रकारितेतील नव्या संधी, व्यावसायिक अडचणी, महिलांचे अधिकार, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पहिल्या दिवसाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून, रविवारी अधिवेशनाचा समारोप होईल. महिला पत्रकारांचे प्रश्न केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता त्यावर संघटितपणे आवाज उठविता यावा, त्यांच्या अनुभवांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, या दृष्टीने लातूरमध्ये सुरू झालेले हे राज्यस्तरीय अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply