📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

एकाच भूखंडावर पती-पत्नीला घरकुल मंजूर झाल्याचा आरोप; चौकशीची मागणी

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित अनियमिततेची तपासणी करा; दोषींवर निलंबनाची कारवाई करा – विक्रम पाटील बामणीकर

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी परिसरात एकाच कुटुंबातील पती-पत्नीच्या नावे घरकुल मंजूर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नांदेड दक्षिण उपशहर प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी केली आहे.

यासंदर्भात बामणीकर यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनानुसार, महानगरपालिकेच्या डीपीआर-४ अंतर्गत ब्रह्मपुरी येथील जब्बार अहमद आणि त्यांच्या पत्नी यास्मिन अहमद या दोघांचाही घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नीच्या नावे घरकुलाचा लाभ मंजूर कसा झाला, असा प्रश्न उपस्थित करत या मंजुरी प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी बामणीकर यांनी केली आहे.

याशिवाय, पहिल्या हप्त्याच्या बिलासाठी अपलोड करण्यात आलेल्या जिओटॅग छायाचित्रांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. मंजूर घरकुलाचा प्रत्यक्ष भूखंड आणि छायाचित्रांमध्ये दर्शविण्यात आलेला भूखंड वेगवेगळा असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक अनियमितता झाली आहे का, याचीही पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे, लाभार्थ्यांची पात्रता, मंजुरी प्रक्रिया आणि जिओटॅग छायाचित्रांची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम पाटील बामणीकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!