हिमायतनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधवांना प्रामाणिकपणे व आत्मीयतेने वैद्यकीय सेवा देणारे ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास वानखेडे यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांची पुन्हा हिमायतनगर येथे नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांसह पत्रकारांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना नांदेड येथील कार्यक्रमादरम्यान जाहीर निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, डॉ. विकास वानखेडे यांनी आपल्या सेवाकाळात हिमायतनगर तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तत्परतेने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतमजूर, कष्टकरी आणि आदिवासी बांधवांना त्यांनी आपुलकीने उपचार दिल्याने परिसरात त्यांची ‘गरिबांचे डॉक्टर’ अशी ओळख निर्माण झाली आहे.
मात्र, डॉ. वानखेडे यांची बदली झाल्याने तालुक्यातील शासकीय आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. खासगी रुग्णालयांमधील महागडा उपचार सर्वसामान्यांना परवडत नसल्याने शासकीय रुग्णालयात अनुभवी आणि सेवाभावी वैद्यकीय अधिकारी असणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हिमायतनगर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांची होणारी गैरसोय आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. डॉ. विकास प्रकाशराव वानखेडे (वैद्यकीय अधीक्षक, वर्ग-१) यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे नियुक्त करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर कल्याण वानखेडे पळसुरकर, लक्ष्मण वानखेडे, सतीश वाडेकर, नवदीप वानखेडे, सुनील पतंगे यांच्यासह हिमायतनगर तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष नागोराव शिंदे पळसुरकर, गंगाधर गायकवाड दिघीकर आणि देवानंद गुंडेकर यांनी पुढाकार घेतला. डॉ. वानखेडे यांच्या बदलीबाबत तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक आणि रुग्णांमधून नाराजी व्यक्त होत असून, त्यांची बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर या जनभावनेची दखल घेऊन काय निर्णय घेतात, याकडे हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply