📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नांदेडच्या लक्ष्मीनगरात प्लॉटचे कंपाउंड उकरून ५७ हजारांचा ऐवज लंपास!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

लोखंडी टीनपत्रे, लाकडी बल्ले, पाइप आणि महावितरणचे मीटर चोरीला; विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी): शहरातील लक्ष्मीनगर परिसरात तक्रारदाराच्या मालकीच्या प्लॉटचे आधीपासून असलेले कंपाउंड उकरून आत ठेवलेले बांधकाम साहित्य आणि महावितरण कंपनीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये लोखंडी टीनपत्रे, लाकडी बल्ले, लोखंडी पाइप, लाईट मीटर आणि वायर असा एकूण ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शेख अजहर पी. शेख याहिया (वय २० वर्षे, रा. लक्ष्मीनगर, नांदेड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, लक्ष्मीनगर येथील गट क्रमांक १४१/३ मधील प्लॉट क्रमांक २५६ व ३२५ हे तक्रारदाराच्या स्वतःच्या नावावर आहेत. या दोन्ही प्लॉटभोवती यापूर्वीच कंपाउंड करण्यात आलेले होते. प्लॉटच्या कंपाउंडवर टीनपत्रे बसविण्यासह इतर कामांसाठी आवश्यक साहित्य आणून ठेवण्यात आले होते. दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता तक्रारदार आपल्या वडिलांसह आणि मित्रांसोबत प्लॉटची पाहणी करण्यासाठी गेले असता, प्लॉटचे कंपाउंड उकरून आत ठेवलेला मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये ४ बाय १२ फूट आकाराची ३२ लोखंडी टीनपत्रे (प्रत्येकी १ हजार १०० रुपये), १२ फूट लांबीचे २४ लाकडी वळे (प्रत्येकी ३०० रुपये), दोन इंची सहा लोखंडी पाइप (प्रत्येकी १ हजार ६५० रुपये) तसेच महावितरण कंपनीचे लाईट मीटर व इलेक्ट्रिक वायर यांचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत ५७ हजार ३०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्लॉटच्या मालकी व हद्दीवरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. काही व्यक्तींनी प्लॉटवर आपला हक्क असल्याचा दावा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे सदर साहित्याची चोरी कोणी केली, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून, या दिशेने तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. घटनेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार राणे करीत आहेत. स्वतःच्या मालकीच्या प्लॉटचे कंपाउंड उकरून आत ठेवलेला हजारोंचा मुद्देमाल चोरीला गेल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!