📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

तामसात पावसासाठी मुस्लिम समाजाची विशेष प्रार्थना

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

ईदगाह मैदानावर नमाज-ए-इस्तिस्का अदा; शेतकरी आणि नागरिकांसाठी समाधानकारक पावसाची दुआ

तामसा (अर्जुन जोशी) : मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाळ्याचे जवळपास तीन महिने उलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेती व्यवसायासह जनजीवनावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर तामसा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने पावसासाठी विशेष नमाज-ए-इस्तिस्का अदा करण्यात आली. शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता तामसा येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी अल्लाहकडे पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. पावसाची कमतरता दूर व्हावी, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडावा आणि शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा, अशी प्रार्थना करण्यात आली. नमाज-ए-इस्तिस्का ही पावसासाठी अल्लाहकडे विशेष दुआ आणि प्रार्थना करण्याची नमाज मानली जाते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून इस्तिगफार केला तसेच सदका-खैरात देऊन पावसासाठी प्रार्थना केली. पाऊस हा केवळ शेतकऱ्यांच्या शेतीपुरता मर्यादित विषय नसून, पिण्याचे पाणी, पशुधन, शेती आणि एकूणच जनजीवनाशी निगडित आहे. त्यामुळे धर्माच्या सीमा ओलांडून प्रत्येकाच्या जीवनाला दिलासा देणारा समाधानकारक पाऊस पडावा, या सद्भावनेतून ही विशेष प्रार्थना करण्यात आली. या वेळी मौलाना जुबेर, मौलाना फिरोज, हाफिज नईम साहेब, अब्दुल रहीम हाफिज साहेब, शब्बीर पठाण, हाफिज इमरान यांच्यासह मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर चिंता असताना तामसातील या सामूहिक प्रार्थनेतून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आणि निसर्गाच्या कृपेसाठी सामूहिक सद्भावनेचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!