📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

तामसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन तास रास्ता रोको

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन; विखे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन, वाहतूक ठप्प

तामसा (अर्जुन जोशी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देत सकल मराठा समाजाच्या वतीने तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि. ११) जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे तामसा शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली, तर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तामसा तसेच आष्टी परिसरातील शेकडो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर प्रतिमेचे दहन करून आंदोलकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे आंदोलनाला अधिक आक्रमक स्वरूप आले.

तीन तास वाहतूक ठप्प : सुमारे तीन तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे तामसा शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने नागरिक व प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. आंदोलनस्थळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

सकल मुस्लिम समाजाचा पाठिंबा; आंदोलकांना खिचडीचे वाटप : दरम्यान, तामसा येथील सकल मुस्लिम समाजाने मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात सहभागी झालेल्या समाजबांधवांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून आंदोलनादरम्यान सामाजिक सलोखा आणि एकजुटीचा संदेश देण्यात आला.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तामसा पोलीस ठाण्याचे सपोनि शहादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुप्त शाखेचे प्रकाश कबळे, विभागीय गुप्त शाखेचे विठ्ठल ढोले, बिट जमादार शाम नागरगोजे यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. आंदोलन शांततेत पार पडल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला असून, तामसातील तीन तासांच्या रास्ता रोकोने या मागणीची तीव्रता अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!