📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांचा अवैध गॅस रिफिलिंगवर दणका

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

११७ गॅस सिलेंडरांसह ३ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांना ताब्यात

नांदेड (प्रतिनिधी) : घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररीत्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून विक्री करणाऱ्या रॅकेटवर नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव परिसरात करण्यात आलेल्या छाप्यात ११७ गॅस सिलेंडरांसह तब्बल ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नांदेड जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरून विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. ९ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना धनेगाव येथील एकबाल नगर परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून इलेक्ट्रिक मोटार व विशेष पंपाच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकला असता, तेथे दोन व्यक्ती आढळून आल्या. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे गॅस विक्री अथवा सिलेंडर साठवणुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ११७ गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ६८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्वलनशील घरगुती गॅसची अशाप्रकारे बेकायदेशीर हाताळणी केल्याने स्फोट होऊन मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही आरोपींकडून निष्काळजीपणे हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले तसेच पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध गॅस रिफिलिंगमुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेता, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गॅस व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!