📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

कंधारच्या भूमिपुत्राची गगनभरारी; कुलगुरूपदाने वाढविला कंधारचा मान…!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

कर्तृत्व, गुणवत्ता आणि अथक परिश्रमांना मिळाले मानाचे शिखर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गीते; मित्रमंडळींकडून कौतुकाचा वर्षाव

कंधार (प्रतिनिधी) : जिद्द, चिकाटी, गुणवत्ता आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाची शिखरे सर करीत कंधारच्या मातीचा नावलौकिक उंचावणारे भूमिपुत्र डॉ. व्यंकट गीते यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरूपदी त्यांची झालेली नियुक्ती ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून कंधारच्या भूमीसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरला आहे. डॉ. व्यंकट गीते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दि. १२ सप्टेंबर रोजी नियोजन भवन, नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कंधारच्या या भूमिपुत्राच्या कर्तृत्वाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या उपस्थितीत झाला गौरव : 

या सत्कार सोहळ्यास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी खासदार तथा लोहा-कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खासदार डॉ. अजित गोपछडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते डॉ. व्यंकट गीते यांचा सत्कार करण्यात आला. कंधारच्या एका भूमिपुत्राने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्यातील प्रतिष्ठेच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्वोच्च पदापर्यंत घेतलेली झेप ही कंधारकरांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या यशामुळे कंधारच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कर्तृत्वाने कंधारच्या नावाला नवी उंची प्राप्त झाली आहे.

मित्राच्या यशात मित्रमंडळींचा अभिमान : 

डॉ. गीते यांच्या कुलगुरूपदी नियुक्तीची बातमी समजताच त्यांच्या मित्रपरिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मित्रमंडळींनी त्यांचा मनःपूर्वक सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी डॉ. आनंद भगत, नवनाथ तोरणे, संजय आवाळे, प्रवीण मुखेडकर, बालाजी गायकवाड, ज्ञानेश्वर बिडवई, शिवकुमार बचेवार, वैजनाथ भोस्कर, प्रभाकर बोड्डावार, राजकुमार बिडवई, दिगंबर गडपलेवार, प्रशांत संगेवार आणि राजाराम पांडागळे यांच्यासह मित्रमंडळी मोठ्या उत्साहाने उपस्थित होती. ‘मित्राच्या यशाचा आनंद म्हणजे स्वतःच्या यशाचा अभिमान,’ या भावनेतून मित्रमंडळींनी डॉ. व्यंकट गीते यांच्या यशाचा आनंद साजरा केला. अनेक वर्षांची मैत्री, संघर्षाच्या काळातील सोबत आणि आज कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचलेल्या मित्राचा अभिमान—या भावना यावेळी उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होत्या. डॉ. व्यंकट गीते यांनी आपल्या ज्ञान, अनुभव आणि प्रशासकीय क्षमतेच्या बळावर कुलगुरूपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडावी, महाराष्ट्राच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला नवी दिशा द्यावी आणि आपल्या कार्यातून भावी पिढीस प्रेरणा मिळावी, अशा मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी मित्रमंडळींनी व्यक्त केल्या.

कंधारच्या मातीतील कर्तृत्वाला मानाचा मुजरा :

एखाद्या व्यक्तीचे यश हे केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही; तर ते त्या मातीचा, त्या परिसराचा आणि त्या समाजाचा गौरव वाढवते. डॉ. व्यंकट गीते यांच्या कुलगुरूपदी झालेल्या नियुक्तीने याच भावनेची प्रचिती दिली आहे. कर्तृत्वाला भौगोलिक सीमा नसतात आणि गुणवत्तेला योग्य संधी मिळाली की सामान्य परिस्थितीतूनही असामान्य यशाची गगनभरारी घेता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणून डॉ. व्यंकट गीते यांच्या यशाकडे पाहिले जात आहे. आज कंधारचा भूमिपुत्र राज्याच्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर विराजमान झाला आहे. ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून कंधारच्या मातीची ताकद, संस्कार आणि कर्तृत्वाची ओळख आहे. डॉ. व्यंकट गीते यांच्या या अभूतपूर्व यशाने कंधारचा मान उंचावला असून, त्यांच्या भावी कार्यकाळात महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!