📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

दोन स्वतंत्र कारवायांत १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त; चार आरोपींविरुद्ध गुन्हे

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व रेती चोरीला आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांत १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत वाहेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच संबंधित व्यक्तींनी पलायन केले. पोलिसांनी ७ तराफे आणि १४ ब्रास वाळू असा सुमारे ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत मार्कंड येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दोन व्यक्ती अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच ते पळून गेले. घटनास्थळावरून एक इंजिन, आठ तराफे आणि १६ ब्रास वाळू असा एकूण ७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ११७२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाया पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव व पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केल्या. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन, रेती चोरी आणि विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी अवैध रेती उत्खनन, वाहतूक अथवा गौण खनिज चोरीची माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!