कुमार गटातील मुले-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आवाहन
नांदेड (सफदर पटेल) : नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने कुमार गटातील मुले व मुलींची नांदेड जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा संकुल (वसतिगृह), श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीतून पात्र व गुणवंत खेळाडूंची जिल्हा संघासाठी निवड करण्यात येणार असून, निवड झालेल्या कुमार गटातील मुला-मुलींच्या संघाला दि. ८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान विरार, जिल्हा पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुमार गट कबड्डी स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
१८ सप्टेंबरपर्यंत नोंदणी बंधनकारक : निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी दि. १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत नाव नोंदणी करून प्रवेश शुल्क भरावे, असे आवाहन जिल्हा कबड्डी असोसिएशनने केले आहे. नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही खेळाडूला निवड चाचणीत सहभागी होता येणार नसल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य : निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी अपडेटेड आधार कार्डची रंगीत झेरॉक्स प्रत, जन्म दाखला अथवा इयत्ता पहिलीचा निर्गम उतारा सोबत आणणे आवश्यक आहे. निर्गम उताऱ्यावर विद्यार्थ्याचा फोटो, मुख्याध्यापकांची सही व शाळेचा शिक्का असणे गरजेचे आहे. तसेच शाळेचा UDISE क्रमांक व Student ID नमूद असणे आवश्यक आहे. याशिवाय शाळेच्या बोनाफाईड प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचा फोटो, मुख्याध्यापकांची सही व शिक्का तसेच Student ID असणे आवश्यक असून, खेळाडूंनी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत. आवश्यक कागदपत्रांशिवाय निवड चाचणीत सहभागी होता येणार नाही, असे असोसिएशनने कळविले आहे.
मुलांसाठी ७०, तर मुलींसाठी ६५ किलो वजनाची अट : निवड चाचणीसाठी कुमार मुलांच्या खेळाडूंचा जन्म दि. ५ नोव्हेंबर २००६ नंतरचा असावा आणि त्यांचे वजन ७० किलोच्या आत असणे आवश्यक आहे. तर कुमार मुलींचा जन्म दि. ३० नोव्हेंबर २००६ नंतरचा असावा आणि त्यांचे वजन ६५ किलोच्या आत असणे आवश्यक आहे.
व्हॉट्सॲपवरही करता येणार नोंदणी : स्पर्धेसाठी इच्छुक खेळाडूंनी आपली नोंदणी ९९७०५१६९४४ / ७३५०१३२१११ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष भेटून करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गुणवंत आणि इच्छुक कबड्डीपटूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे आणि नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवावी, असे आवाहन नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव यांनी केले आहे.
Leave a Reply