पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते नांदेड येथे पुरस्कार प्रदान; महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रमांची उल्लेखनीय कामगिरी
तामसा (अर्जुन जोशी) : हदगाव तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मीमांसा फाऊंडेशन आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी हदगाव तालुक्यातील पळसा येथील सविता निमडगे यांची निवड त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन करण्यात आली. त्यांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पापड उद्योग, शिलाई-कापड दुकान यांसारखे उपक्रम राबविले आहेत. महिला सक्षमीकरण आणि आर्थिक बळकटीकरणासोबतच गरजू नागरिकांना मदत करणे, समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि विविध सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणे, अशी त्यांची कार्याची वाटचाल आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या माध्यमातून सार्वजनिक पातळीवर गौरव मिळाला आहे. त्यांच्या कार्यामुळे परिसरातील महिलांना आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
पुरस्कार मिळाल्यानंतर सविता निमडगे यांचे हदगाव तालुक्यात विविध स्तरातून अभिनंदन होत असून, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. या पुरस्कार सोहळ्यास आमदार बालाजी कल्याणकर, उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, नांदेड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख, दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, आयोजक-नियोजक रुपेश पाडमुख, बालाजी दुधंबे, प्रा. अमृत जाधव, पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्यासह मीमांसा फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
Leave a Reply