📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

तामसाचा अंधार अन् घाणीच्या साम्राज्यावर आमदार कोहळीकरांचा संताप; दोन दिवसांची ‘डेडलाईन’!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

चार-पाच वर्षांपासून बंद स्ट्रीटलाईट-हायमॅक्सचा मुद्दा ऐरणीवर; ग्रामपंचायतीच्या ढेपाळलेल्या कारभारावर नागरिकांचा आक्रोश

तामसा (अर्जुन जोशी) : हदगाव तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या तामसा शहरात गेल्या चार-पाच वर्षांपासून बंद असलेले स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यावर साचलेले सांडपाणी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शहरातील या गंभीर परिस्थितीची माहिती नागरिकांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासमोर मांडताच त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. मंगळवारी तामसा भेटीदरम्यान नागरिकांनी शहरातील विविध समस्यांचा अक्षरशः पाढाच आमदार कोहळीकर यांच्यासमोर वाचला. सण-उत्सवाच्या काळातही शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अंधारात राहत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यानंतर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने कानउघडणी करत समस्या त्वरित सोडविण्याचे निर्देश दिले.

‘दोन दिवसांत दिवे सुरू करा’; संबंधित अधिकाऱ्याला थेट इशारा : तामसातील बंद स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्सबाबत संबंधित अधिकाऱ्याशी आमदार कोहळीकर यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स बंद का आहेत, अशी थेट विचारणा त्यांनी केली. यावर संबंधित अधिकाऱ्याने टोलनाका सुरू झाल्यानंतरच स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स सुरू होतील, अशी माहिती दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. या उत्तरामुळे आमदार कोहळीकर संतप्त झाले. “येत्या दोन दिवसांत स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स सुरू करा; अन्यथा गाठ माझ्याशी आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी संबंधितांना सुनावल्याचे उपस्थितांनी सांगितले. आमदारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संबंधित यंत्रणेत खळबळ उडाल्याचे चित्र आहे.

आठवडी बाजारापासून बसस्थानकापर्यंत कचऱ्याचे साम्राज्य : तामसा शहरातील आठवडी बाजार परिसर, जुने व नवीन बसस्थानक परिसर तसेच प्रमुख रस्त्यांवर ओला आणि सुका कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक नाल्या तुंबलेल्या असून नाल्यांचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. दुभाजकांमध्येही कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

चार-पाच वर्षांपासून दिवे बंद; शहर अंधारात : मुख्य रस्त्यावरील स्ट्रीटलाईट तसेच विविध चौकांमधील हायमॅक्स अनेक वर्षांपासून बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली प्रकाशयंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी असलेले हायमॅक्सही बंद असल्याचे नागरिकांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील इतर भागांतही प्रकाशव्यवस्थेची परिस्थिती समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले.

गणेश विसर्जनापूर्वी स्वच्छता करण्याचे निर्देश : गणेश विसर्जनाचा सण जवळ आलेला असताना शहरात मोठ्या प्रमाणावर असलेली घाण आणि कचरा पाहता आमदार कोहळीकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीचे प्रशासक जी. पी. मोळके आणि ग्रामपंचायत अधिकारी शंकर आलेवाड यांना बोलावून शहरातील समस्यांबाबत जाब विचारला. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास होऊ नये, यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रशासकांच्या बदल्यांनीही तामसा चर्चेत : तामसा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभारही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सुमारे पाच महिने ग्रामपंचायत प्रशासकाविना होती. त्यानंतर विस्तार अधिकारी सतीश फुलारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत नाही तोच विस्तार अधिकारी जी. पी. मोळके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात तामसा ग्रामपंचायतीला दोन प्रशासक पाहावे लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकांच्या नियुक्त्या बदलत असताना शहरातील मूलभूत समस्या मात्र कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

आता ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेच्या कार्यवाहीकडे लक्ष : आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीनंतर बंद स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स प्रत्यक्षात सुरू होतात का, शहरातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य हटविले जाते का, तुंबलेल्या नाल्यांची सफाई होते का, याकडे तामसावासीयांचे लक्ष लागले आहे. आमदारांच्या कडक भूमिकेनंतर ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित रस्ते प्राधिकरण आता किती तत्परतेने हालचाल करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्यांवर आता तरी प्रत्यक्ष काम सुरू होणार का, हा प्रश्न तामसावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!