📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

कामळजच्या शेतकरी सुदाम ढगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; दुष्काळाच्या संकटाने कुटुंबाचा आधार हरपला

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

शेतातील पिके वाळत असल्याने चिंतेत असलेल्या ढगे यांनी विष प्राशन केल्याची माहिती; नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

नांदेड (शेख मुख्तार) : मुदखेड तालुक्यातील कामळज येथील अल्पभूधारक शेतकरी सुदाम धर्माजी ढगे (वय ३५) यांचे विष प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. सध्या परिसरात निर्माण झालेल्या पावसाअभावी परिस्थितीचा आणि शेतातील उभ्या पिकांच्या नुकसानीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असताना ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री सुदाम ढगे यांनी तणनाशक औषध प्राशन केले. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि २२ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुदाम ढगे हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या सुदाम यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

दुष्काळी परिस्थितीने शेतकरी संकटात : कामळज परिसरासह मुदखेड तालुक्यात पावसाअभावी शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी वाळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा : सुदाम ढगे यांच्या निधनानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने दिलासा मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि प्रशासकीय आधार मिळणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी गांभीर्याने घेऊन तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुदाम ढगे यांच्या निधनाची वार्ता समजताच कामळजसह मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!