हेमला तांडा-बाभुळगाव येथे प्रमाणपत्रे व शासकीय योजनांसाठी विशेष शिबिर; नागरिकांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही
नांदेड (शेख मुख्तार) : भटक्या-विमुक्त व वंचित घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी, यासाठी महसूल विभाग, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भटक्या विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अंतर्गत हेमला तांडा-बाभुळगाव येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रशासनाच्या सकारात्मक आणि लोकाभिमुख पुढाकारामुळे शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद शाळा, हेमला तांडा-बाभुळगाव येथे आयोजित या शिबिरात विविध प्रमाणपत्रे, ओळखपत्रे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांसाठी नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे उपलब्ध नोंदीनुसार अनेक सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांवर त्याच शिबिरात कार्यवाही करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
२५० हून अधिक अर्जांवर प्रमाणपत्रांसाठी कार्यवाही : शिबिरातील नोंदीनुसार आधारकार्डासाठी ३०, शिक्षणपत्रिकेसाठी २०७, जात प्रमाणपत्रासाठी २१, उत्पन्नाचा दाखला ३५, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र ७, रहिवासी/अधिवास प्रमाणपत्र २५, विवाह नोंदणी प्रमाणपत्र १२, दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र १२ आणि आयुष्मान भारत कार्डासाठी १३ अर्ज प्राप्त झाले. यापैकी संबंधित नोंदीनुसार प्राप्त अर्जांच्या संख्येइतकीच कार्यवाही झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून, शासनाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा उपक्रम म्हणून या शिबिराकडे पाहिले जात आहे.
शासकीय योजनांचाही नागरिकांना लाभ : शिबिरात केवळ प्रमाणपत्रांपुरती कार्यवाही मर्यादित न ठेवता विविध कल्याणकारी योजनांसाठीही अर्ज स्वीकारण्यात आले. श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेसाठी ७, संजय गांधी निराधार योजनेसाठी ५, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ४ आणि पीएम किसान योजनेसाठी २ अर्ज प्राप्त झाले. तसेच एकत्रित आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी १३ अर्ज नोंदविण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचे परिश्रम : हे शिबिर डॉ. सचिन खल्लाल (उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी) आणि स्वप्निल दिगलवार (तहसीलदार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रवींद्र राठोड (पुरवठा निरीक्षण अधिकारी), ज्ञानेश्वर श्रीरामे (पुरवठा विभाग), संदीप कार्लेकर (बीएलओ), संतोष आरकुलकर (मंडल अधिकारी, तुप्पा), अविनाश करंदीकर (तलाठी, बाभुळगाव), कवटीकवार सर (मु.अ., हेमला तांडा), कदम आर.एस. (ग्रामसेवक, बाभुळगाव) आणि पालेकर मॅडम (कृषी सहाय्यक) यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी समन्वय साधत आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे, अर्ज स्वीकारणे आणि संबंधित योजनांसाठी मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवादाला चालना मिळाली, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.
प्रशासनाच्या लोकाभिमुख भूमिकेचे कौतुक : भटक्या-विमुक्त समाजातील अनेक नागरिकांना प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी विविध विभागांच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरला. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शिबिराला मिळालेला प्रतिसाद आणि झालेली कार्यवाही ही शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल ठरले आहे. विशेषतः वंचित व भटक्या-विमुक्त घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची सातत्याने आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले.
Leave a Reply