तामसा (अर्जुन जोशी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेत मतदार यादीतील नावे, वैयक्तिक तपशील तसेच नकाशीकरणाशी संबंधित नोंदी तपासल्या जात असून, आढळणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या मतदार यादीतील नोंद काळजीपूर्वक तपासावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. नावात चुकीची नोंद, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये बदल, नोंदीचे अनमॅपिंग अथवा अन्य कोणतीही त्रुटी आढळल्यास आवश्यक कागदपत्रांसह ती दुरुस्त करून घेता येणार आहे. मतदारांच्या नोंदीची पडताळणी करताना उपलब्धतेनुसार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही यांसह संबंधित कागदपत्रांचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवून आपली नोंद तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रामराघव माधवराव देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादीतील आपले नाव व त्यासोबत नमूद असलेला तपशील योग्य आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित मतदारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कालावधीत मतदारांनी आपले नाव, पत्ता, इतर तपशील तसेच मॅपिंगशी संबंधित नोंदी तपासून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. मतदार यादीतील नोंद अचूक असणे हे मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या पुनरीक्षण प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहावे आणि उपलब्ध संधीचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मतदार यादी तपासणीसाठी विशेष मोहीम; चुका दुरुस्त करण्याची ३० सप्टेंबरला संधी
फॉन्ट:
Leave a Reply