📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

नांदेड तालुक्यात ई-पिक पाहणीला वेग; १५ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

सर्वेअर, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या कामाचा तहसीलदार संजय वारकड यांनी घेतला आढावा

नांदेड (शेख मुख्तार) : खरीप हंगामातील पिकांची अचूक आणि अधिकृत नोंद महसूल यंत्रणेकडे उपलब्ध व्हावी, यासाठी नांदेड तालुक्यात सुरू असलेल्या सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्वेअंतर्गत (DCSMH App) ई-पिक पाहणीच्या कामाला आता गती देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश नांदेडचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संजय वारकड यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. ई-पिक पाहणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवन, नांदेड येथे सर्वेअर, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन उभ्या पिकांची पाहणी करणे, पिकांची अचूक माहिती संकलित करणे आणि ती DCSMH App वर वेळेत नोंदविण्याच्या प्रक्रियेवर तहसीलदार वारकड यांनी भर दिला. पिकांच्या नोंदीमध्ये अचूकता राहण्यासाठी सर्वेअर आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तर मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणाचे प्रभावी नियोजन करून नियमित संनियंत्रण करावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांच्या शासकीय लाभांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संबंधितांनी कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले. ई-पिक पाहणी केवळ पिकांची नोंद करण्यापुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांसाठी ती महत्त्वाची शासकीय नोंद ठरणार आहे. पिकांची अधिकृत माहिती उपलब्ध असल्याने पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ देताना या नोंदीचा उपयोग होणार आहे. दरम्यान, ई-पिक पाहणीची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनीही महसूल विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले. नियुक्त सर्वेअर किंवा ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शेतात पाहणीसाठी आल्यानंतर आवश्यक माहिती व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांच्यासह नांदेड तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि सर्वेअर (सहाय्यक) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!