जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या पुढाकारातून नागरिकांना मोठा दिलासा; विविध प्रकारच्या आधार अपडेटसह नव्या नोंदणीचीही सुविधा
नांदेड (शेख मुख्तार) : आधार कार्डशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्वी नांदेडमध्ये उपलब्ध नसल्याने नागरिकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे वेळ, पैसा आणि मोठ्या प्रमाणात श्रम खर्च होत होते. मात्र आता नांदेडमध्येच अत्यंत महत्त्वाच्या आधार सेवांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांची ही धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नांदेडमधील आधार सेवा केंद्रात आधारशी संबंधित विविध गुंतागुंतीची कामे करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः पाच वर्षांनंतर मुलांचे बायोमेट्रिक अपडेट व पूर्ण आधार अपडेट येथे करता येणार आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण होऊनही आधार न बनविलेल्या नागरिकांसाठी नवीन आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
लग्नानंतर महिलांना आधारमध्ये पतीचे नाव अपडेट करण्याची सुविधा येथे मिळणार आहे. तसेच आधारमधील नाव किंवा जन्मतारखेत बदल करण्याची निर्धारित मर्यादा संपलेली असली, तरी संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक प्रक्रियेनुसार अपडेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय दिव्यांग, विशेष गरजा असलेली मुले, महिला तसेच स्थलांतरित कामगार आणि मजूर यांच्यासाठीही आधारशी संबंधित आवश्यक सेवा या केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज अनेक नागरिकांची आता टळणार आहे.
नांदेडमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे विशेष योगदान असल्याचे केंद्र चालक गिरीसर यांनी सांगितले. नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच आवश्यक आधार सेवा मिळाव्यात, या दृष्टीने झालेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“आधारशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना मुंबईला जाण्याची वेळ वाचणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आधार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे,” असे आवाहन केंद्र चालक गिरीसर यांनी केले. नांदेडमध्येच उपलब्ध झालेली ही सुविधा नागरिकांसाठी केवळ वेळ आणि पैशांची बचत करणारी नसून, आधार सेवांचा लाभ अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करणारे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.


Leave a Reply