📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

व्हाईस ऑफ मीडिया बिलोली तालुकाध्यक्षपदी वलीओद्दीन फारुखी यांची बिनविरोध निवड

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार; जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

नांदेड (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या बिलोली तालुकाध्यक्षपदी पत्रकार तथा समाजसेवक वलीओद्दीन फारुखी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे बिलोली तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, पत्रकारांच्या विविध अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा मार्ग अधिक बळकट होणार आहे.

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने बिलोली येथे आयोजित बैठकीत पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संघटनेचे मराठवाडा आध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पत्रकारांना काम करताना येणाऱ्या अडचणी, पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली.

याच बैठकीत वलीओद्दीन फारुखी यांच्या नावाची तालुकाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या नावाला उपस्थित पत्रकारांनी एकमताने पाठिंबा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यानंतर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत यांच्या हस्ते फारुखी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

पत्रकारांना वार्तांकन करताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा पत्रकारांच्या मूलभूत सुविधांपासून त्यांच्या विविध हक्कांपर्यंतचे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या संबंधित प्रशासन व विभागांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. यासाठी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वलीओद्दीन फारुखी यांनी पत्रकारांच्या हिताला प्राधान्य देत तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. पत्रकारांना त्यांचे काम अधिक सक्षमपणे करता यावे, यासाठी आवश्यक सुविधा आणि हक्क मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तालुक्यातील पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या संघटितपणे मांडण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रकारांच्या कामात अडथळे निर्माण झाल्यास त्यावर संघटनेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने आवाज उठविणे, पत्रकारांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस व्हाईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य नागेश कल्याणे, जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया शेख याहीया, जिल्हाध्यक्ष आरोग्य विंग संजय धर्मरे, नायगाव तालुकाध्यक्ष गंगाधर ढवळे यांच्यासह बिलोली शहर व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वलीओद्दीन फारुखी यांच्या निवडीमुळे बिलोली तालुक्यात व्हाईस ऑफ मीडियाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!