📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

इतवारा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; दोन टिप्पर व एक टेम्पोसह १०.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

नांदेडमध्ये दोन स्वतंत्र कारवाया; चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध रेती वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई केली आहे. इतवारा येथील किल्ला रोड आणि एम.जी.आर. गार्डन परिसरात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन टिप्पर आणि एका टेम्पोसह एकूण १० लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

किल्ला रोडवर टेम्पोसह रेती जप्त : १६ ऑक्टोबर २०२६ रोजी इतवारा पोलिसांचे गुन्हे शोध पथक गस्त घालत असताना किल्ला रोड परिसरात नावघाटाकडून सराफा बाजाराच्या दिशेने जाणारा टाटा कंपनीचा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. वाहनचालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा रॉयल्टी टीपी परवाना मागितला असता, त्याच्याकडे वैध परवाना नसल्याचे समोर आले. तपासणीमध्ये अंदाजे एक ब्रास चोरीची रेती आढळली. या प्रकरणी टेम्पो चालक सुनील किशन कांबळे (वय ३२, रा. चौफाळा, मरघाट, इतवारा, नांदेड) आणि वाहनमालक सईद अशपाक ऊर्फ पैलवान सईद नूर (वय ३५, रा. होळी नावघाट, इतवारा, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा टेम्पो आणि ३ हजार रुपये किमतीची रेती, असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

एम.जी.आर. गार्डन परिसरात दोन टिप्पर पकडले : दुसऱ्या कारवाईत एम.जी.आर. गार्डन परिसरात देगलूर नाक्याकडून माळटेकडीच्या दिशेने जाणारे पांढऱ्या व केशरी रंगाचे दोन टिप्पर पोलिसांनी थांबवले. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये अंदाजे प्रत्येकी दोन ब्रास रेती आढळून आली. संबंधित चालकांकडे रेती वाहतुकीचा वैध रॉयल्टी टीपी परवाना नसल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी टिप्पर चालक तथा मालक गिरीधर दत्ता भालेकराव (वय ३७, रा. गोजेगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) आणि ज्ञानेश्वर जळबा जाधव (वय ३६, रा. वांगी, ता. जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत प्रत्येकी ४ लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर आणि त्यातील रेती, असा एकूण ८ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून अवैध धंद्यांची माहिती देण्याचे आवाहन :दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेतील कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम ४८(७) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर देशमुख आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आपल्या परिसरात अवैध रेती उत्खनन, रेती वाहतूक, जुगार किंवा अन्य बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!