टेम्पोसह गुटखा, सुगंधित पानमसाल्याचा साठा पकडला; दोघांविरुद्ध गुन्हा, एक आरोपी फरार
नांदेड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत २६ लाख २९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि एका टेम्पोचा समावेश आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत १६ ऑक्टोबर २०२६ रोजी इतवारा पोलिसांनी ही कारवाई केली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन इतवारा येथील विणकर कॉलनी कमानीजवळ, भोपळे हॉस्पिटल समोर सापळा रचला. संशयित टेम्पो (क्रमांक MH-26-BE-9071) थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. टेम्पो चालक सोहेल खान बाबर खान (वय २९, रा. खडकपुरा, वजीराबाद, नांदेड) याच्याकडे चौकशी केली असता वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. हा माल विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने वाहून नेला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. या कारवाईत पोलिसांनी राजनिवास सुगंधित पानमसाला १ लाख १ हजार २५० रुपये, ZL जाफराणी जर्दा १७ लाख २८ हजार रुपये, अशोक लेलँड टेम्पो ८ लाख रुपये अशा प्रकारे एकूण २६ लाख २९ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी टेम्पो चालक सोहेल खान बाबर खान आणि कथित मालक मोहम्मद मतीन मोहम्मद मुजफ्फर (रा. देगलूर नाका, इतवारा, नांदेड) यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम २६, २७, ३०(२) आणि ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्रेस नोटनुसार, कथित मालक मोहम्मद मतीन मोहम्मद मुजफ्फर फरार आहे.
पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर देशमुख आणि पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बालाजी हिंगणकर, सदाशिव कदम, रेवणनाथ कोरनुळे, हरजितसिंह सुखई, शेख इसराईल, साहेबराव जगताप व मारोती गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली. नांदेड जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, अवैध दारू, जुगार, गुटखा आणि अंमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.
Leave a Reply