भोकर तालुक्यातील चिदगिरी सज्जातील साहेबराव टोमके यांच्यावर कारवाई; भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदेड (खदीर शेख) : पत्नीच्या निधनानंतर तिच्या नावे असलेली शेतजमीन स्वतःच्या नावे करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या भोकर तालुक्यातील चिदगिरी सज्जाचे तलाठी साहेबराव हैबती टोमके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पाच हजार रुपये स्वीकारताना पकडले. गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) भोकर येथील तलाठी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील ६० वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे भोकर तालुक्यातील चिदगिरी येथील गट क्रमांक २९० मध्ये ८० आर शेतजमीन आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर संबंधित जमीन स्वतःच्या नावे करून घेण्यासाठी तक्रारदार २१ ऑक्टोबर रोजी भोकर येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी वारसदारांचे ५०० रुपयांच्या बाँड पेपरवरील संमतीपत्र घेण्यासोबतच तलाठी साहेबराव टोमके यांनी १२ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी शेतजमीन तक्रारदाराच्या नावे करण्यासाठी १२ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे. तडजोडीनंतर पाच हजार रुपये तातडीने, तर उर्वरित सात हजार रुपये दोन दिवसांनंतर देण्याचे ठरल्याचेही समोर आले. यानंतर एसीबीच्या पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तलाठी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने तलाठी टोमके यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रिती जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी पर्यवेक्षण केले. या पथकात पोलीस हवालदार बालाजी मेकाले, अमोल टाक, विनय नुकलवार आणि चालक पोलीस हवालदार रमेश नामपल्ले यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
Leave a Reply