बरबडा, कापशी, कलंबरमधील आरोग्यसेवेचा बोजवारा; छावा मराठा युवा महासंघाचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
नांदेड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नांदेड जिल्ह्यातील बरबडा, कापशी आणि कलंबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांच्या कथित अनियमित उपस्थितीमुळे रुग्णांचे हाल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी छावा मराठा युवा महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाचे उपजिल्हाप्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी नांदेड दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यासह महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनानुसार, नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १०२ रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी चालकाअभावी ती वापराविना उभी आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना खासगी वाहनाने नांदेडला हलविण्याची वेळ येत आहे. तर लोहा तालुक्यातील कापशी आणि कलंबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही डॉक्टर व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, काही केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून केवळ दोन दिवस उपस्थित राहत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. उर्वरित दिवस केंद्रांमध्ये केवळ कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर आरोग्यसेवा सुरू असल्याचे म्हटले आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिला, सर्पदंशाचे रुग्ण आणि अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये IPHS मानकांनुसार आवश्यक असलेल्या ११० प्रकारच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि रुग्णवाहिकेला चालक नसणे, अशा समस्यांमुळे ग्रामीण आरोग्यव्यवस्था प्रभावित होत असल्याचे महासंघाने नमूद केले आहे.
महासंघाच्या प्रमुख मागण्या : – मुख्यालयी न राहणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार निलंबनाची कारवाई करावी. बरबडा, कापशी व कलंबर येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. बरबडा येथील १०२ रुग्णवाहिकेसह जिल्ह्यातील सर्व संबंधित रुग्णवाहिकांना कायमस्वरूपी चालक उपलब्ध करून द्यावेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची नियमित तपासणी करावी.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि ग्रामीण जनतेला वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विक्रम पाटील बामणीकर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply