📅 Sunday, 8 November 2026 | नांदेड / महाराष्ट्र
NEWS 24
SOCIAL MEDIA मराठी वृत्त पोर्टल • नांदेड
⚡ ताज्या घडामोडी

इतवारा झोनच्या जन्म-मृत्यू विभागाला कर्मचाऱ्याची प्रतीक्षा!

फॉन्ट:
WhatsApp वर पाठवा

कर्मचारी बदली झाली; मात्र नवीन नियुक्तीचा पत्ता नाही, नागरिकांचे हेलपाटे सुरूच

नांदेड (शेख मुख्तार) : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या इतवारा झोन कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागात कार्यालीन कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जन्म-मृत्यू दाखले आणि त्यासंबंधित कामांसाठी जुन्या नांदेडमधील अनेक नागरिक दररोज या कार्यालयात येत असतात. मात्र, मागील काही दिवसांपासून या विभागात कर्मचारी नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असून त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अचानक बदली करण्यात आली. प्रशासकीय कारणास्तव बदली करणे हा प्रशासनाचा अधिकार असला, तरी ज्या तत्परतेने कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली, त्याच तत्परतेने त्या जागी पर्यायी कर्मचाऱ्याची नियुक्ती करणेही आवश्यक होते. मात्र, नवीन कर्मचारी नियुक्त न केल्याने जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज प्रभावित झाले असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

विशेष म्हणजे, जन्म-मृत्यू दाखले हे नागरिकांच्या दैनंदिन तसेच शासकीय कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, वारसा हक्क, विविध प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमध्ये या दाखल्यांची आवश्यकता भासते. अशा महत्त्वाच्या विभागात कर्मचारी उपलब्ध नसणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

एखाद्या महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्याची बदली करताना त्याच्या जागी नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे, त्याला संबंधित कामाचे प्रशिक्षण देणे तसेच प्रलंबित कामकाजाची संपूर्ण माहिती आणि जबाबदारी हस्तांतरित करणे ही प्रशासकीय प्रक्रिया अपेक्षित असते. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदली आणि नियुक्तीचे नियोजन करताना नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे एखाद्या विभागाचे कामकाज ठप्प होणे आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणे योग्य नाही. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन इतवारा झोन कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागात तात्काळ पर्यायी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच प्रलंबित कामकाज मार्गी लावून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!