गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे दहा बैलजोड्या कमी; उत्कृष्ट बैलजोड्यांचा सन्मान
तामसा (अर्जुन जोशी) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर व इतर वैज्ञानिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत असल्याने पारंपरिक बैलजोड्यांचे महत्त्व काहीसे कमी होत चालले आहे. याचा परिणाम यंदाच्या बैलपोळा उत्सवावरही दिसून आला असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पोळ्यात सहभागी झालेल्या बैलजोड्यांची संख्या सुमारे दहाने घटल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तामसा येथे बैलपोळा सण पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. एमएसईबी परिसरातील मारुती मंदिर येथे बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच आकर्षक व उत्कृष्ट बैलजोड्यांचा गौरव करण्यात आला. बैलांची उत्तम देखभाल, हष्टपुष्ट शरीरयष्टी, आकर्षक सजावट आणि एकूणच उत्कृष्ट संगोपनाच्या आधारे घेण्यात आलेल्या स्पर्धेत गोविंद नामदेव बाऊलकर यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. अशोक राठोड यांच्या बैलजोडीला द्वितीय क्रमांक, तर बालाजी नामदेव बाऊलकर यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या बैलजोड्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याच्या शेतीतील जिवलग साथीदार असलेल्या बैलांमधील अतूट नाते जपणारा पारंपरिक उत्सव आहे. वर्षभर शेतीकामात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मात्र, शेतीत आधुनिक यंत्रसामग्रीचा वाढता वापर, पशुपालनाचा वाढता खर्च तसेच बैलांच्या संगोपनातील विविध अडचणी यामुळे बैलजोड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंत यावेळी शेतकरी व उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास मंदिर कमिटीचे रामदास घुसे, तुकाराम कंठाळे महाराज, शिवाजी थोटे, बबन डोणगावे, दीपक टवेकर, शिवाजी मुरमुरे, मारुती थोबाळे, सुनील लाभसेटवार यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत तामसा येथे बैलपोळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मात्र, आधुनिक शेतीच्या वाढत्या यांत्रिकीकरणामुळे भविष्यात बैलजोड्यांचे अस्तित्व आणि या पारंपरिक उत्सवाची व्यापकता टिकविण्याचे आव्हान निर्माण होत असल्याची चर्चा यावेळी रंगली.
Leave a Reply